आहार ते लट्ठपणा: मार्गे – मेंदू

सगळ्या जगात आज लट्ठपणाची मोठी लाट आली आहे आणि आरोग्य क्षेत्रात प्रत्येकजण त्याविषयी बोलतोय. त्यातल्यात्यात भारतात तिचा प्रभाव मर्यादित आहे. तरी शहरी सुखवस्तू समाजात खूपजण लट्ठपणाची वाटचाल करताना दिसताहेत. मधुमेहासारख्या आजाराला लट्ठपणाच जबाबदार असल्याचं इतक्या छातीठोकपणे सांगितलं जातं की बारीक असूनही मधुमेही असलेल्यांचा सुद्धा त्यावर विश्वास बसतो. त्यामुळे डाएटिंगची मोठीच चलती आहे. पण आहारातला बदल नक्की काय आणि कसा करायचा याच्याबद्दल खूपच उलट सुलट सल्ले दिले जाताहेत. सामान्य माणसाला नायक आणि खलनायक असलेल्या गोष्टी ऐकायला आवडतात. त्यामुळे आहारातल्या एखाद्या घटकाला खलनायक ठरविणा-या गोष्टी पटकन लोकप्रिय होतात. त्यामुळे गोष्ट तीच ठेवून खलनायकाचं नाव बदलून परत परत नाटकं केली तर ती सगळीच हाउसफुल चालतात.

सुमारे तीस वर्षं आहारातील स्निग्ध पदार्थांना खलनायक करून प्रयोग रंगत गेले. प्रयोगाला लोकप्रियता मिळाली पण समाजाच्या आरोग्यावर काही अनुकूल परिणाम झाल्याचं दिसलं नाही. उलट लट्ठपणाचं आणि मधुमेहाचं प्रमाण वाढतच गेलं. अंड्यामधे कोलेस्टेरोल असतं म्हणून त्याची गणना खलनायकांमधे झाली पण आता त्याची खलनायकाची भूमिका काढून घेतली गेली आहे. आता स्निग्ध पदार्थ किंवा कोलेस्टेरोल असलेले पदार्थ मुळात वाईट नाहीत असं म्हटलं जातय. साखर हा सध्याचा लोकप्रिय खलनायक आहे. कदाचित पुढील तीस वर्षे तो गाजेल. नाटक चांगलं चालेल, आरोग्य आणखी बिघडेल. पण याखेरीज इतर अनेक छोटे मोठे खलनायक पण आहेत. कुणी म्हणतो तळलेले खाऊ नका, पांढरे खाऊ नका, आम्लधर्मी खाऊ नका, विदेशी गाईचं दूध पिऊ नका, फास्ट फूड खाऊ नका, प्रक्रिया केलेले खाऊ नका, मांसाहार करू नका, रेड मीट तर नकोच नको. 

पण आहारातील घटकांवर सगळा ठपका ठेऊन भागत नाही असंही अनेकांच्या लक्षात आलं आहे. मग सकाळची न्याहारी करू नका असा सल्ला देणारे तज्ज्ञ आहेत. न्याहारी कधीही चुकवू नका असं सांगणारेही तज्ज्ञच आहेत. दर दोन तासांनी थोडे थोडे खा म्हणणारे तज्ज्ञ आपल्या सल्यामुळे किती लोकांना फायदा झाला याची आकडेवारी देतात, आणि दिवसातून फक्त दोनदाच जेवा म्हणणारे तज्ज्ञही तितकीच डोळे दिपवणारी आकडेवारी देतात. जपान मधले सुमो पैलवान भारी वजनाला फार महत्व देतात. तो कुस्तीचा प्रकारच असा आहे की जेवढं वजन अधिक तेवढा कुस्तीतला वरचश्मा अधिक. त्यांचा वजन वाढविण्याचा जो मंत्र आहे तो आहे दिवसातून फक्त दोनदाच खायचं. भरपूर खायचं पण फक्त दोनदाच. यानी त्यांचं वजन हमखास वाढतं. याउलट दोनदा जेवून वजन कमी झाल्याची ग्वाही देणारेही खूप आहेत. त्यांचाही अनुभव काही खोटा म्हणता येत नाही. एकीकडे बरोब्बर परस्परविरोधी सल्ला देणारे लोक आपल्याला नेत्रदीपक यश मिळाल्याचे दावे करताहेत आणि दुसरीकडे एकच मंत्र वापरून परस्पर विरोधी परिणाम झाल्याची उदाहरणेही आहेत. याचं मर्म नक्की काय आहे?

याच महिन्यात प्रसिद्ध झालेला बल्गेरियामधला एक प्रयोग काही वेगळंच सुचवतो. व्हेलेंटिन पनायोतोव्ह नावाच्या संशोधकानी काय केलं, चौदा लट्ठ माणसांचे दोन गट केले. दोन्ही गटांना सारखाच आहार नेमून दिला पण त्यापैकी एका गटाला सांगितलं की तुम्हाला दिलेला आहार कमी उष्मांकवाला आहे त्यानी तुमचं वजन कमी होईल. दुस-या गटाला सांगितलं की तुम्हाला अगदी मोजून उष्मांक दिले आहेत. त्यानी तुमचं वजन आहे तेवढच राहील. प्रत्यक्षात आहार नेमून देण्याआधी प्रत्येकाचं रोजचं उर्जाज्वलन किती आहे याचं मोजमाप करून आहार ठरवला होता. तो असा होता की कुणाचंही वजन कमी होण्याची अपेक्षा नव्हती. हा प्रयोग आठ आठवडे चालला. दर दोन आठवड्यांनी प्रत्येकाचा आहार व्यायाम सांगितल्याप्रमाणे चालू आहे ना हे तपासून पहिलं जात होतं. शरीरावरचे परिणामही पाहिले जात होते. सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे काटेकोरपणे केल्या जातील याची शक्य तितकी काळजी घेतली जात होती.

आठ आठवडयानंतर असं झालेलं दिसलं की ज्यांना तुमचा आहार कमी ऊष्मांकाचा आहे असा विश्वास दिला गेला होता त्यांचं सरासरी वजन सुमारे दहा किलोंनी कमी झालं. दुस-या गटात काही दिसेलसा फरक पडला नाही. म्हणजे प्रत्यक्षात डाएटिंग करत नसून आपण डाएटिंग करत आहोत अशा नुसत्या विश्वासानी वजन कमी झालं. ते सुद्धा थोडं थोडकं नाही तर आठ आठवडयात दहा किलोंनी, म्हणजे आठवडयाला सरसरी सव्वा किलो. वैद्यकशास्त्राला ही गोष्ट नवीन नाही. आपल्यावर उपचार केले जाताहेत या भावनेनी सुद्धा माणसाला बरं वाटू लागतं. नुसतं मानसिक बरं वाटतं असं नाही तर त्याचे शारीरिक परिणामही दिसू लागतात. याला वैद्यकशास्त्रात प्लासेबो परिणाम असं म्हणतात. नुसत्या प्लासेबो परिणामामुळे दोन आठवड्यात दहा किलोनी वजन कमी होणं शक्य आहे असे हे प्रयोग दाखवतात. अशा प्रकारचे प्रयोग इतरत्र करून त्याची विश्वासार्हता तपासून पाहिली पाहिजे ही गोष्ट खरी. पण हा प्रयोग विश्वासार्ह मानला तर यातून आहार आणि लट्ठपणा यांच्या संबंधातली अनेक न सुटलेली कोडी सुटू शकतात. वेगवेगळ्या आणि परस्परविरुद्ध आहारतत्वांचा पुरस्कार करणा-या लोकांना तितकेच चांगले रिझल्ट मिळू शकतात ते या प्लासेबो परिणामामुळेच. पण प्रत्येक पठडीमधे ते काही जणांमधेच मिळतात काहींमधे नाही. याची कारणं त्या आहारतत्वांपेक्षा माणसांच्या मानसिकतेत असावीत असं दिसतं.

जगाच्या पाठीवर निरनिराळे समाज काय काय आणि कशा प्रकारे खात आले आहेत हे पाहिलं तर थक्क व्हायला होतं. त्यात वनस्पतिज अन्न क्वचितच पहायला मिळणारे एस्किमो आहेत. ज्यांच्या उर्जेचा ७० % पुरवठा प्राणिज चरबीमधूनच होतो असे मसाई समाज आहेत, ६०% तेलबियाच खाऊन जगणारे कलहारी कुंग तर ८५ % पिष्टमय पदार्थांवर जगणा-या काही अफ्रीकन जमाती आहेत. या कुणामधेही आत्ता आत्तापर्यंत म्हणजे शहरीकरणापर्यंत लट्ठपणा आणि मधुमेह सहसा सापडत नव्हते. याचा अर्थ माणूस मुळात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहार पचवायला समर्थ आहे. जगाच्या पाठीवर माणूस काय काय खात आला आहे त्या आहारातली विविधता पाहिली तर गेल्या पाच पन्नास वर्षात आपल्या आहारात झालेला बदल किस झाडकी पत्ती. म्हणजे आहाराचा प्रकार आणि लट्ठपणा यांचा फार घट्ट संबंध असावा असे पुरावे नाहीत. लट्ठपणा आणि मधुमेह यांचा संबंध तरी कुठे इतका बळकट आहे? लट्ठपणामुळेच मधुमेह होतो असा एकेकाळी समज होता. अजूनही बरेच लोक या समजातून बाहेर पडलेले नाहीत. पण छप्पन अभ्यासांची आकडेवारी एकत्र अभ्यासल्यानंतर असं दिसून आलं आहे की लट्ठपणा आणि मधुमेह यांचा परस्पर संबंध फक्त १५ % आहे. लट्ठपणाचं मूळ आहारात आहे या समजाला जसा सज्जड पुरावा मिळत नाही तसा मधुमेहाचं मूळ आहारात आहे किंवा लट्ठपणात आहे या समजुतीलाही मिळत नाही. मिळतात ते फक्त परस्परविरोधी दावे आणि धार्मिक श्रद्धांना मागे टाकतील अशा छद्मवैज्ञानिक श्रद्धा.

आता नव्यानी वाढू लागलेली समज अशी आहे की या दोन्हीचं मूळ मेंदूमधल्या प्रक्रियांमधे आहे. आपण लट्ठ व्हायचं की बारीक आणि रक्तातली साखर कमी ठेवायची की जास्ती हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपला मेंदू ठरवत असतो. आता यात सहभाग असलेल्या मज्जापेशी कोणत्या, त्या कशी कशी मज्जा करतात आणि का करतात अशा गोष्टींवर संशोधन सुरु झाले आहे. शेवटी आपण किती खावे, सकाळी रक्तामधली साखर किती असावी, इन्सुलिन तयार करणा-या पेशींनी कसे वागावे, कधी आणि किती इन्सुलिन सोडावे हे शेवटी बऱ्याच अंशी मेंदूच ठरवत असतो हे स्पष्ट झाले आहे. मेंदूला बाजूला ठेवून मधुमेह समजण्याची सुतराम शक्यता नाही हे संशोधनाने स्पष्ट केले आहे. आपला मेंदू कधी आणि का असे करतो याचे सिद्धांत मांडलेही गेले आहेत. पण त्यावर अजून एकमत झालेले नाही. ते झालं तर मधुमेहावरची उपचारपद्धती पूर्णपणे बदलेल. ती बदलणं हे आजच्या औषध कंपन्यांच्या हिताचं नाही, त्यामुळे त्या वैज्ञानिकांसकट सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत राहतील. पण आज ना उद्या विज्ञानाचा जोर एवढा वाढेल की त्यांना ते मान्य करावं लागेल. तूर्तास आपण एक नक्की करू शकतो की पाठ्यपुस्तकांनी तीस वर्षांपूर्वी मधुमेहाविषयीआम्हाला जे शिकवलं ते अंतिम सत्य होतं असं न समजता नव्या संशोधनाबरोबर उभ्या राहणा-या नवीन शक्यतांना सामोरं जावं, पण त्याही आंधळेपणानी न स्वीकारता अभ्यास आणि पुरावे काय म्हणतात ते पहावं. आज ना उद्या आपण आज असाध्य समजल्या जाणा-या मधुमेहासारख्या रोगांवर निश्चितच मात करू शकू आणि लट्ठपणालाही आपल्या आज्ञेत रहायला लावू शकू.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: