कोव्हिडचे आकडे काय बोलताहेत हे आपण मागल्या लेखात पाहिलं. पण आकड्यांचं हे बोलणं न ऐकताच अनेक धोरणं आखली आणि राबवली गेली आहेत. ही गोष्ट भारतापुरती मर्यादित नाही हे आवर्जून सांगितलं पाहिजे. सगळ्या जगातच आकड्यांचा अडाणीपणा भरपूर प्रत्ययाला आला आहे. आपण इथे विचार मात्र जास्ती करून भारताचाच करणं नैसर्गिक आहे. कोव्हिडचं स्वरुप सुरुवातीला वाटलं होतं त्यापेक्षा खूपच कमी घातक आहे आणि दिवसेंदिवस त्याची घातकता आणखी आणखी कमी होत आहे याची आकडेवारी आता सर्वांसाठी खुली आहे. जर रोग भयंकर असला तर उपाय त्रासदायक असला तरी करावा लागतो. प्रत्यक्षात तो वाटलं त्यापेक्षा एक दशांशानेच घातक आहे. त्यामुळे आता या रोगाविषयीची आपली धोरणं बदलायला हवीत. लॉकडाउनचा उपाय हा पोटावर बसलेल्या माशीला तलवारीने मारण्यासारखा आहे. जोवर कँसरला आळा घालण्यासाठी तम्बाखू आणि सिगरेटबंदी होत नाही तोवर सरकारनी कोव्हिडला आळा घालण्याच्या उदात्त हेतूनी पुनश्च लॉकडाउन केलं यावर कुणी दूधखुळाही विश्वास ठेवणार नाही.
आकड्यांना विज्ञानात महत्त्व असलं तरी सगळ्याच गोष्टी आकड्यांमधे पकडता येत नाहीत. विज्ञानात कुठलीही गोष्ट वस्तुनिष्ठ पद्धतीनी दाखवता आणि मोजता येण्याला फार महत्त्व आहे. पण प्रत्यक्षात महत्त्वाच्या असलेल्या सगळ्याच गोष्टी मोजता येण्यासारख्या नसतात. खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी मोजता येत नसतील तर ज्या गोष्टी मोजता येतात त्यांना महत्त्वाचं मानायचं असा एक मोह वैज्ञानिकांना होतो. त्यामुळे काही काही गोष्टी महत्त्वाच्या असूनही त्याविषयी गरजेपेक्षा कमी बोललं जातं. अशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपचार करणा-या डॉक्टरांचा अनुभव. किती चाचण्या झाल्या आणि किती पॉजिटिव आल्या एवढच बोलून चालणार नाही तर प्रत्यक्ष त्यावर काम करणा-यांना काय दिसत आहे त्याचीही दखल घ्यायला हवी. कोव्हिडच्या साथीमधे लक्षणे न दाखवणा-यांचं प्रमाण नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे अनेक अभ्यास सुचवतात. हे प्रमाण आणखी वाढेल असं सुचवणारीही काही लक्षणं दिसताहेत. तेंव्हा टेस्ट पॉजिटिव येते का नाही, किती जणांच्या पॉजिटिव आल्या या आकडेवारीला यापुढे फार महत्त्व राहणार नाही. देण्याची आवश्यकताही नाही. सर्दी कोणाला होते याची आपण राष्ट्रीय पातळीवर नोंद ठेवतो का? जर ९५% लोकांसाठी कोव्हिड सर्दीसारखाच असेल तर त्या प्रत्येकाची चिंता का करायची? सर्दीपेक्षा कोव्हिड खूपच जास्ती घातक आहे पण तो फक्त काही टक्के लोकांना. त्यामुळे पॉजिटिव किती आले यापेक्षा नक्की धोकादायक लक्षणं कोणती? ती लवकर कशी ओळखायची? रुग्णालयात दाखल करणं कधी अत्यावश्यक आहे? कधी घरीच काळजी घेऊन चालेल? या गोष्टींवर अनुभवी डॉक्टरांनी अधिक संशोधन, चर्चा आणि प्रबोधन करणं आवश्यक आहे. ज्याला दाखल करण्याची आवश्यकता आहे अशा कुठल्याही कानाकोप-यातील व्यक्तीला सुद्धा काही मिनिटांमधे अॅम्बुलेंस मिळेल की नाही? कुठे दाखल व्हायचं? कसं व्हायचं हे समाजातल्या प्रत्येकाला नीट माहिती आहे की नाही? यावर सगळा फोकस असायला हवा. संसर्ग होणा-यांपैकी अगदी कमी टक्क्यांवर घातक परिणाम दिसतात. ही टक्केवारी दिवसेंदिवस घटतही आहे. पण जोवर ती आहे तोवर अशा रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्यावर आणि त्याना वाचवण्यावर भर दिला पाहिजे. जर त्यांच्यातला मृत्युदर खाली आणण्यात आपण नेत्रदीपक यश मिळवू शकलो तर बाकी लोकांत विषाणू हवा तितका बागडेना का!!
आपल्या डोळ्यासमोर कॉलरा, गॅस्ट्रोसारखी उदाहरणं आहेत. एकेकाळी यांनी माणसं, विशेषतः लहान मुलं पटापट मरत होती. या रोगांचा नायनाट मुळीच झालेला नाही. याच्या जंतूंचा संसर्ग होणं मुळीच थांबलेलं नाही. पण आता मृत्यूदर एकदम कमी झाला आहे कारण याची लक्षणं दिसली तर लगेच काय करावं याविषयी योग्य प्रबोधन झालं आहे. आणि ते देशाच्या कानाकोप-यातल्या आरोग्यसेवकांपर्यंत अगदी व्यवस्थित पोचलं आहे. म्हणजे सर्वर्थानी नाही पण उपयुक्त अर्थानी आपण कॉलरा, गॅस्ट्रोची लढाई जिंकली आहे.
कोव्हिड पसरण्याचा वेग पाहता आपल्याला संसर्ग थांबवता येईल अशी शक्यता आता दिसत नाही. पहिल्या लॅाकडाउनच्या काळात तो प्रयोग करून झाला. त्यानी काही काळ संसर्गाचा दर कदाचित कमी झाला असेल कदाचित. तो झाला असं दाखवणारा पुरावा नाही. झाला अशी आपण श्रद्धा ठेऊ हवं तर. पण व्हायरसचा निःपात करणं साधलं नाही हे नक्की. हा कुणाचा दोष नाही. भारतासारख्या गर्दी, गर्दी आणि गर्दीच्या देशात हे मुळात अवघडच होतं. पण तो ही प्रयत्न आपण करून पाहिला. आणि काही नाठाळ वगळता बहुतेक लोकांनी त्याला मनापासून साथही दिली. आता रोगाची साथ त्यापलीकडे गेली आहे. तेंव्हा संसर्ग थांबवण्यापेक्षा मृत्युदर आणखी कमी करण्यावर सर्व लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एकीकडे हे प्रयत्न चालू आहेतच. पण दुसरीकडे आज किती पॉजिटिव निघाले त्याचे आकडे दाखवून लोकांना निष्कारण घाबरवलं जात आहे. आता लोकांनीच आकड्यांचे अर्थ नीट ओळखून त्याला महत्त्व द्यायचं आणि निष्कारण घाबरायचं बंद केलं पाहिजे. प्रत्यक्षात कुठलीही लक्षणं न दाखवता पॉजिटिव निघणा-यांचं प्रमाण वाढत आहे हे चांगलंच लक्षण आहे. वाईट नाही. कारण असे लोकच समाजाला हर्ड इम्युनिटीकडे अधिक लवकर पोचवतील. क्वचित केंव्हातरी अशा लोकांकडून एखाद्या वृद्ध व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो हे अशक्य नाही. पण आज तरी अशा संसर्गाचं प्रमाण फार असल्याचं दिसत नाही. तसं असतं तर एव्हाना मृत्यूनी देशभर थैमान घातलं असतं. प्रत्यक्षात भारतात दररोज २५००० च्या वर मृत्यू होतात. त्यावर दिवसाला ५०० कोव्हिडचे. म्हणजे कोव्हिडनी सुमारे २ % नी देशातला मृत्युदर वाढवला आहे. हे घाबरून जाण्यासारखं नक्कीच नाही. अर्थात हे दोन टक्के सुद्धा कमी करण्याचं ध्येय आपण ठेवलं पाहिजे पण त्यासाठी आख्ख्या समाजाला ओलीस ठेवणं समजण्या सारखं नाही.
थोडक्यात संसर्ग वेगानी वाढणं ही चिंता करण्याची गोष्ट नाही. चिंता करण्याची गोष्ट ही की समाजातील ज्या व्यक्तींना कोव्हिड घातक ठरण्याची शक्यता आहे अशा वृद्ध, मधुमेही, हृदयरोगी व्यक्तींची काळजी कशी घ्यायची. म्हणजे आता आपली धोरणं साथ पसरण्याला आळा घालण्यापेक्षा जास्ती धोका असलेल्या व्यक्तींची काळजी घेण्याकडे वळली पाहिजेत.
बदललेल्या धोरणातलं पहिलं म्हणजे लॅाकडाउन ची आता कुठेच आवश्यकता नाही आणि त्याचा उपयोग होतो असा पुरावाही नाही. आता सर्व लोकांना आपला रोजगार परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. क्वारंटाइन ही गोष्ट लॅाकडाउन पेक्षा वेगळी आहे. त्याची आवश्यकता नक्कीच आहे आणि अजून काही काळ राहील. पण आता कोव्हिड पॉजिटिव लोकांची संख्या एवढी वाढली आहे की प्रत्येकाला क्वारंटाइन फॅसिलिटी देणं शक्य नाही. होम क्वारंटाइनची पद्धत सुरु झाली आहेच. पण यामधे लक्षणांवर बारकाईनी लक्ष ठेवण्यावर, त्यासाठी पुरेसं प्रबोधन करण्यावर भर दिला गेला पाहिजे. एखादी व्यक्ती पॉजिटिव निघते तेंव्हा तिला जर लक्षणे नसतील तर काही व्यक्तींना ती कधीच दिसणार नाहीत, काहींना थोडया दिवसात दिसू लागतील, त्यापैकी काहींमधेच ती गंभीर होतील. तेंव्हा गंभीर केस लवकर कशी ओळखायची आणि तिला योग्य ते साहाय्य लगेच कसं उपलब्ध करून द्यायचं हा नजीकच्या भविष्यातला कळीचा मुद्दा असणार आहे. गंभीर केसला एकीकडे चांगले उपचार आणि दुसरीकडे काटेकोर क्वारंटाइन अशा दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे.
एखादी केस बिन लक्षणाची आणि एखादी गंभीर होण्यामागे दोन कारणं असू शकतात. एक तर व्यक्तीव्यक्तींच्या प्रतिकारक्षमतेतला फरक आणि दुसरं म्हणजे विषाणूमधलाच फरक. विषाणूंमधे सतत म्युटेशन, सतत बदल होत असतात. त्यामुळे त्यांची घातकताही कमी अधिक होत असते. एका बिन-लक्षणी व्यक्तीमधे या दोनापैकी कोणतं कारण काम करत आहे हे सांगता येत नाही. पण समाजातल्या काहींमधे हे तर काहींमधे ते कारण असणार हे तर्काला धरून आहे. आता आपण सर्व गंभीर केसेसना काटेकोरपणे क्वारंटाइन करत राहिलो आणि बिन-लक्षणी केसेस मधून विषाणू अधिक पसरत राहिला तर कमी घातक विषाणूचा अधिक प्रसार होईल असे उत्क्रांतीचे गणित सांगते. आणि गेल्या तीन महिन्यात सातत्याने कमी होणारा मृत्युदर या गणिताला पुष्टीही देतो. त्यामुळे गंभीर केसेसना काटेकोरपणे क्वारंटाइन करत राहिलो तर विषाणूची घातकता दिवसेंदिवस कमी होत जाईल. सर्व केसेसना क्वारंटाइन करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी नजीकच्या भविष्यात ते व्यवहार्य राहणार नाही. पण हा चिंतेचा विषय मुळीच नाही. किंबहुना बिनलक्षणी व्यक्तींनी खुशाल लोकांमधे मिसळणं दीर्घकालीन फायद्याचंच ठरेल अशी शक्यता आहे. खुशाल खेळायला हरकत नाही असा हा जुगार आहे कारण झाला तर फायदाच, आणि तो न खेळण्याचा पर्याय आपल्या हातात राहण्याची शक्यता एवितेवी दिसतच नाही. मग तो न खेळण्याचं नाटक तरी का करायचं?
असं व्यवहार्य तत्त्वज्ञान स्वीकारलं तर अनेक गोष्टी पूर्ववत होतील आणि तशा होण्यातच समाजाचं हित आहे. आता शिक्षण बंद ठेवण्याचं बदललेल्या परिस्थितीत काहीच प्रयोजन दिसत नाही. तरुण वयात कोव्हिडचा संसर्ग झाला तरी गंभीर लक्षणं दिसण्याचं प्रमाण मुळातच कमी आहे. आणि शिक्षण ही दारूच्या दुकानांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट नक्कीच आहे. त्यामुळे किमान महाविद्यालये आणि माध्यमिक शाळा पूर्ववत न करण्याचं काही तर्कशुद्ध कारण दिसत नाही.
आता लॅाकडाउन आणि कंटेनमेंट ची अंमलबजावणी करण्यात वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा लोकांना स्वछ्तेच्या सवयी लावण्यावर भर द्यायला हवा. रस्त्यात थुंकणे आणि तत्सम अस्वच्छ सवयींना दंड करण्याचं प्रमाण वाढायला हवं. कोट्यावधि लोकांना थोडया तरी स्वच्छतेच्या सवयी लागल्या तर काही हजार लोकांचं बलिदान वाया गेलं नाही असं नक्की म्हणता येईल. कोव्हिडवर प्रभावी लस या वर्षात तरी येण्याची शक्यता नाही. विषाणूचा नायनाट करणे दाट लोकवस्तीच्या देशात शक्य नाही. हर्ड इम्युनिटी सव्वाशे कोटींच्या लोकसंख्येला यायला हवी असेल तर दोन पाच वर्षे तरी लागतील किंवा आपणहोऊन प्रयत्नपूर्वक संसर्गाचा वेग वाढवावा तरी लागेल. म्हणजे हे तीन्ही उपाय साधणारे नाहीत. आता आपण या विषाणूला स्वीकारणे, त्याच्या सकट पुन्हा जोमाने कामाला लागणे आणि अधून मधून गंभीर निघू शकणा-या आजा-यांची शक्य तितकी काळजी घेणे हाच सर्वात चांगला उपाय आहे. दाट शक्यता अशी आहे की काही काळातच इतर सर्दी, खोकला, तापासारखाच हा एक होऊन जाईल.