मी शाळा सोडायला निघालो होतो. इयत्ता नववी किंवा दहावी असेल. मला जे शिकावंसं वाटतं ते या शिक्षणात मला मिळत नाही. मग मी का शिकावं असा माझा प्रश्न होता. मला नक्की काय करायचंय किंवा काय शिकायचंय याची मला फार स्पष्ट कल्पना होती असं नाही. पण जे शिकतोय आणि जो अभ्यास करायला लागतोय त्याचा मला नक्की काय उपयोग असा प्रश्न नक्कीच स्पष्ट होता. बरं शिकून नोकरीच करायची तर मला काही फार पगाराची अपेक्षा नव्हती. प्यूनची नोकरी सुद्धा मला चालेल. नोकरीचे तास पाट्या टाकल्यावर बाकीचा वेळ मला जे मनापासून करावंसं वाटतं ते करण्यात घालवता येईल. मला तत्वज्ञान किंवा असं काहीतरी शिकण्यात रस होता, आणि त्याला कशाला डिग्री बिग्री लागते. तुकाराम कुठे पीएचडी होते? असं काहींसं माझं गणित होतं.
तो काळ कानफटात ठेऊन गधड्या आपली अक्कल चालवू नकोस, गप गुमान अभ्यास कर असं म्हणणं चूक मानणारा नक्कीच नव्हता. नवीन वारे वाहायला लागले होते थोडे थोडे, पण अजून तो मुख्य प्रवाह म्हणा मुख्य फॅशन म्हणा झाला नव्हता. त्यामुळे मला कानफटात खावी लागेल याची माझी एकीकडे तयारी होती. पण आईनी मला वेगळ्या तऱ्हेनी समजावलं.
“हे बघ, या शिक्षणात काही अर्थ नाही हे मला मान्य आहे. पण तू सोडून दिल्यानी त्यात काही फरक पडणार आहे का? शिक्षणव्यवस्था बदलणार आहे का? स्वतःसाठी पळवाट शोधू नकोस. शिकून एवढा मोठा हो कि तुझ्या शब्दाला किंमत येईल. मग ही व्यवस्थाच बदल. तुझ्यासारखी मुलं पुढच्या पिढीतही असतील. त्यांना खरोखर मनापासून शिकता येईल असं त्या व्यवस्थेत काहीतरी मिळेल असं पहा.”
हे मला काही फार पटलं होतं असं नाही. पण काय ते असो, प्रत्यक्षात मी शिक्षण सोडलं नाही एवढं खरं. रडत खडत का होईना, शाळा कॉलेजमधे गेलो. आदर्श विद्यार्थी वगैरे झालो नाही पण शिकलो. मग शिकवायला आवडतं म्हणून शिक्षक झालो. तेंव्हा ते फार अवघड नव्हतं. नशिबाचीही साथ होती. त्यामुळे एमेस्सी झाल्या झाल्या लेक्चरर होता आलं. पुढे पीएचडी पण झालो. ते ही भारतातल्या अव्वल संस्थेमधून. मग विभाग-प्रमुख, ही समिती, ती समिती, मोठ्या प्रतिष्ठित संस्थेत प्रोफेसर हे सगळं झालं. पण माझ्या मनातलं शिक्षणाचं चित्र चाकोरीतल्यापेक्षा वेगळंच राहिलं. ते आणखी विकसित होत गेलं. मी माझं स्वातंत्र्य घेऊन, कधी व्यवस्थेशी भांडून, मला जसं शिकवायचं होतं तसच शिकवत गेलो. जे प्रयोग करावेसे वाटले ते करत गेलो. जेंव्हा त्यासाठी भांडावं लागलं तेंव्हा भांडत गेलो. काही अंशी तरी शिक्षक संशोधक म्हणून नाव झालं.
मग औपचरिक रित्या निवृत्तही झालो, म्हणजे चार वर्ष आधीच निवृत्ती घेतली. त्याहून स्पष्ट शब्दात म्हणजे भांडून संस्था सोडली. काम थांबलं नाही. पण दहावीत मला शाळा सोडून जे स्वतंत्रपणे काहीतरी करायचं होतं ते आता करतो आहे. आणि आता हा प्रश्न विचारतो आहे की आईच्या म्हणण्याप्रमाणे काही झालं की नाही झालं? की माझंच म्हणणं खरं ठरलं? उत्तराचे अनेक पदर आहेत, सगळेच्या सगळे मला कळले असतील असंही नाही. पण मला जे चित्र दिसतं ते असं.
एक तर कुठल्याही पातळीवर व्यवस्था बदलली नाही. अधिक चांगली होणं सोडाच, शिक्षणाची अवस्था घसरतच चालली आहे. आणि मी बघत बसण्याखेरीज काहीच करू शकलो नाही. या समितीवर, त्या समितीवर असतानाही नाही आणि आता तर नाहीच नाही. इतरांच्या विरोधासह जे काही बदल मी आग्रहाने करून घेतले ते सगळे माझ्या नंतर पुन्हा मूळ पदालाच नाही तर त्याहूनही वाईट अवस्थेला गेले. काही बाबतीत वर वर पाहता मला जे हवं होतं ते व्यवस्थेनी स्वीकारलेलं दिसतं, पण ते दिखाव्यापुरतंच. आतून पोकळ.
उदाहरणार्थ मुलांनी स्वतःचे प्रश्न विचारावेत, आधीच्या समजुतींना आव्हाने द्यावीत, नवीन कल्पना लढवाव्यात, शक्य तिथे मनातल्या कल्पना साकार करून पाहाव्यात यासाठी मी बरेच प्रयत्न केले. त्यातून काहीबाही घडलं सुद्धा. विज्ञानातील अनेक अंधश्रद्धा उघडकीला आल्या, छोटी मोठी नवीन तत्वे सापडली, त्यातून किमान काही विद्यार्थ्यांची मानसिकता घडण्याला हातभार लागला. अनेक पेपर पब्लिश झाले. त्याचा त्या त्या विद्यार्थ्यांची करिअर घडायला फायदा झाला. पण याचे काही दीर्घकालीन चांगले परिणाम झाले की नाही ते सांगता येत नाही. माझे जे विद्यार्थी संशोधन क्षेत्रात शिरले ते बहुतेक त्यातल्या मुख्य प्रवाहापुढे शरणागती पत्करून. मला अपेक्षित बंडखोरी त्यांच्यात पुढे फारशी दिसली नाही. सुरुवातीला आमच्या पदवीपूर्व वर्षातल्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आपल्या नवीन संकल्पना, नवीन प्रश्न घेऊन पेपर पब्लिश केले तेंव्हा त्याला काही एक वेगळं मूल्य होतं. आता शिक्षण संस्थांनी पेपर पब्लिश करावेत याचे सोपे फोर्म्युले निघालेत. त्यात काही नाविन्य, काही ओरीजिनॅलिटी, किमान प्रामाणिकपणा असो नसो. नावावर पेपर लागतो. त्यासाठी खोटा डेटा, प्रत्यक्षात न केलेले प्रयोग, वांग्मयचौर्य अशा गोष्टी सर्रास घडू लागल्या आहेत. असे मार्ग वापरून ज्या यशाचा आभास निर्माण करतात अशाच संस्था पुढे येतात. पैसे कमावतात. म्हणजे कुठेतरी मीच सुरु केलेल्या प्रथेचं संपूर्ण विकृतीकरण होऊन त्यावर ढोल बडवणे चालू आहे.
जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांना काही किमान गणित, संख्याशास्त्र, प्रोग्रामिंग यायला पाहिजे आणि त्यातून जी विचारपद्धती निर्माण होते त्याचा जीवशास्त्र समजायला उपयोग झाला पाहिजे या विचारानी मी जीवाशात्स्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश करण्याचा आग्रह धरला. मी स्वतः हे विषय शिकवायचो. पण आता अनेक अभ्यासक्रमांमधून हे पुन्हा हद्दपार झाले आहेत किंवा मम म्हणण्यापुरतेच उरले आहेत. बायोइनफॉर्मॅटिक्स सारखे विषय चलनी झाले हे खरं. पण इथे फक्त काही तयार सॉफ्टवेअर वापरून चरकातून डेटा बाहेर कसा काढायचा हेच शिकवलं जातं. हा तंत्रकौशल्य शिकण्याचा कोर्स झाला आहे. विज्ञान किंवा तंत्रज्ञान नाही.
महाविद्यालयांना स्वायत्तता असावी असा आग्रह मीच धरला होता. माझा त्यामागचा अनुभव असा कि आम्हाला दर्जेदार शिक्षण देण्याच्या मार्गात विद्यापीठाचे सुमार दर्जाचे अभ्यासक्रम मधे येत आहेत. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयांना, किमान चांगल्या विभागांना स्वायत्तता द्यावी. म्हणजे त्यांची कामगिरी अधिक सरस होईल. आता चांगले प्राध्यापक निवृत्त झाले, नव्या नेमणुका झाल्याच नाहीत, रोजंदारीवर सुमार दर्जाचे शिक्षण रेटले जाते. अशी महाविद्यालयांची संपूर्ण वासलात लागल्याची खात्री झाल्यावर मग स्वायत्तता दिली जात आहे. या सगळ्या गोष्टी पाहत राहण्याखेरीज काही करणे शक्य नाही. म्हणजे या बाबतीत तरी माझ्या आईचं म्हणणं जरासुद्धा खरं झाल्याचं दिसत नाही. व्यवस्था चांगल्या दिशेनी बदलण्यासाठी माझा काडीइतकाही उपयोग झाला नाही.
याउलट संस्थात्मक शिक्षण-संशोधनाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्याहातून जे झालं आणि चालू आहे ते मी शिक्षणसंस्थांमध्ये राहून करत होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक भरीव आहे, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ते करण्यात मला बरीच जास्ती मजा येत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर शेतकरी स्वतःच संशोधक होऊन उत्तर शोधू शकतात याची उदाहरणे दाखवून देऊ शकलो. संशोधन संस्थांमध्ये नसलेले विद्यार्थी, गृहिणी, निवृत्त व्यक्ती केवळ मला इंटरेस्ट आहे म्हणून संशोधन करून विज्ञानात नवीन संकल्पनांची भर घालू शकतात हे दाखवून दिलं. माझ्यासारखीच चाकोरीबद्ध शिक्षणात न रमणारी मुलं माझ्याकडे अजूनही येतात. आम्ही विविध विषयांवर बोलतो, नवीन प्रश्न विचारतो, नवीन आव्हाने उभी करतो, स्वतः शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातून विज्ञानाला नवीन असं काहीतरी सापडतंही. ते प्रसिद्धही करतो. किती पेपर प्रसिद्ध केले यावर कुणी आमचं मूल्यमापन करणार नसतं. याचा परिणाम अधिक चांगल्या संशोधनात होतो. गेल्या सात वर्षात माझ्या हातून वर्षागणिक जेवढं नाविन्यपूर्ण, कल्पनासमृद्ध, वैविध्यपूर्ण आणि उपयुक्त काम झालं तेवढं मोठ्या संस्थेमध्ये राहूनही याआधी झालं नव्हतं.
मग माझं म्हणणं खरं झालं की आईचं? याचं उत्तर अजूनही इतकं सरळ नाही. मी शाळा-कॉलेज मग IISc सारखी संस्था यातून काहीच शिकलो नाही असं नाही. शाळा सोडून मला ते मिळालंच नसतं असं कदाचित नाही म्हणता येणार. पण व्यवस्थेत राहून त्यातल्या काही गोष्टी तर सोप्या गेल्या असाव्यात. पण जे महत्वाचं मिळालं ते कोर्सवर्क मधून नाही तर इतर वेळी केलेल्या चर्चा, वादविवाद, करून पाहू म्हणून कुतूहलातून केलेल्या गोष्टींमधून मिळालं. सुदैवानी पीएचडी च्या वेळी मला माझ्या मनातल्या प्रश्नावर, मी आखलेल्या पद्धतींनी माझ्या जबाबदारीवर काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. तसं होणार नसेल तर मी पीएचडी सोडून निघून जाईन असं मी जाहीर केलंच होतं. पण ती वेळ आली नाही. शाळा महाविद्यालयातल्या सगळ्या नाही तरी अनेक शिक्षक-प्राध्यापकांनी माझं बंडखोर वागणं चालवून घेतलं. हे सगळे सुदैवी घटक माझ्या बाजूला आहेतच. पण त्यामुळे मला या शिक्षणपद्धतीचा फायदा झाला हेही कुठेतरी खरं आहेच. म्हणजे आईचं म्हणणं पूर्णपणे खोटंही ठरलं नाही. शिक्षण आणि संशोधन व्यवस्था बदलणं माझ्या हाताबाहेर आहे हे खरं असलं तरी मी एक गोष्ट नक्की करू शकलो ती म्हणजे चागलं शिक्षण आणि संशोधन दोन्ही या व्यवस्थेच्या पूर्णपणे बाहेर उत्तम प्रकारे होऊ शकतं याचं एक मॉडेल नक्कीच उभं करून दाखवू शकलो. संशोधन ही काही कुणाची मक्तेदारी नाही. ज्याच्या मनात प्रश्न आहे, ज्याच्या स्वभावात बंडखोरी आहे, ज्याची नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आहे असा कुणीही मुलभूत आणि उपयुक्त संशोधन करू शकतो. मला शाळा सोडून तेंव्हा जे करायचं होतं ते व्यवहारात अशक्य नाही हे आज इतक्या वर्षांनी तरी मी दाखवू शकलो आहे. हे करणारा मी पहिला नाही. यापूर्वी विज्ञानात कित्येक मोठ्या मोठ्या गोष्टी शाळेतून काढून टाकलेल्या, अर्धशिक्षित, गृहिणी, विद्यार्थी यांनी केल्या आहेत. दुर्दैवानी आज हे क्षेत्र खूपच कर्मकांडात अडकलं आहे. पीएचडी म्हणजेच संशोधन अशा चुकीच्या समजुतीत गुरफटलं आहे. या कर्मकांडाच्या पलीकडे विज्ञान आहे हे एका छोट्याश्या पातळीवर मी दाखवून देऊ शकलो एवढी तरी माझी बाजू नक्कीच खरी आहे.

